दापोलीत अवैध दारू बाळगणाऱ्यावर कारवाई
४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दापोली :
दापोली तालुक्यात विनापरवाना व बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने देशी व परदेशी दारूचा साठा अपने ताबाक्यात बाळगणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२८ वाजण्याच्या सुमारास दापोली येथील राजेंद्र मयेकर यांच्या किराणा दुकानापाठीमागे एका भिंतीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली.
राजेंद्र चंद्रकांत मयेकर (वय ४७, रा. टांगर, गावठाणवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी राजेंद्र मयेकर हा कोणत्याही परवान्याशिवाय, बेकायदेशीररित्या आणि विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यामध्ये दारूचा साठा बाळगून असताना मिळून आला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीचे पोलीस हवालदार योगेश दशरथ शेटये (वय ४०, नेमणूक स्था.गु.अ. शाखा) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून दिनांक २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३५ वाजता महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.