खेड येथे अतिमद्यपानामुळे प्रौढाचा मृत्यू
खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
खेड :
खेड रेल्वे स्टेशन स्टॉप येथील पिकअप शेडच्या बाजूला एका ४१ वर्षीय व्यक्तीचा संशयित मृतदेह आढळून आला. अतिमद्यपानाचे व्यसन आणि वारंवार येणाऱ्या फिट्सच्या त्रासामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव किरण दगडू जाधव (वय ४१, सध्या रा. पटवर्धन लोटे आवाशी, ता. खेड, जि. रत्नागिरी, मूळ रा. कळंबणी खुर्द पिंपळवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे आहे.
मिळालेल्या तपशिलानुसार, मृत किरण जाधव यांना अति मद्यपानाचे व्यसन होते आणि त्यांना वारंवार फिट्स येत होत्या. दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ते त्यांचा पुतण्या नितीन दगडू जाधव याच्यासोबत कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात होते. त्यानंतर ते लहान भावाकडे गेले नाहीत.
दरम्यान, दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्टेशन स्टॉपवरील पिकअप शेडच्या बाजूला एक मृतदेह आढळून आल्याची माहिती वेरळचे पोलीस पाटील संजय शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील संजय शिंदे यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून डॉक्टरांना बोलावून घेतले. रुग्णवाहिकेशी आलेल्या डॉक्टरांनी घटनास्थळी तपासणी करून रात्री १० वाजता किरण जाधव यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी खबर देणार तुळशीराम भार्गव जाधव यांनी खेड पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, दिनांक २ ऑक्टोबर रोजी पहाटे २:५४ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.