जांभेकर विद्यालयात जागतिक माहितीचा अधिकार दिन
रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात जागतिक माहितीचा अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी शिक्षक राजेश कांबळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराचे महत्त्व व उद्देश समजावून सांगितला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मध्ये लागू करण्यात आला असून, शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी या कायद्याचे महत्त्व आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. नागरिकांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने साधारणपणे ३० दिवसांच्या आत देणे अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यकारभार अधिक पारदर्शक, सुरळीत आणि लोकाभिमुख होण्यासाठी माहितीच्या अधिकाराची आवश्यकता आहे. या कायद्यामुळे नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळविण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध झाला आहे, असे राजेश कांबळे यांनी सांगितले.