रत्नागिरी तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी
रत्नागिरी
मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक गणपतीपुळे किनारी दाखल झाले आहेत. शनिवार, रविवारी जोडून सुट्ट्या असल्यामुळे किनाऱ्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी आहे. सध्या समुद्र खवळलेला असल्याने पाण्यात पोहण्यासाठी उतरणाऱ्यांवर अंकुष ठेवताना जीवरक्षकांसह स्थानिक व्यापाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. गणपतीपुळेसह आरे-वारे, नेवरे किनारी पर्यटकांचा अधिक राबता असून पर्यटक बिनधास्तपणे सुमुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी सरसावत आहेत.
शाळा, महाविद्यालयं सुरु झाली असली तरीही शनिवार, रविवारी जोडून येणाऱ्या सुट्टीला पर्यटकांचा कोकणातील राबता कमी झालेला नाही. पावसाचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच पर्यटक गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, दापोलीतील किनाऱ्यांच्या ठिकाणी दाखले झाले होते. सायंकाळी आरे-वारे येथून मावळतीचा सुर्य पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पाऊस किरकोळ असाल्याने त्याचा आनंद समुद्रकिनारी घेण्यासाठी परजिल्ह्यातील पर्यटक येत आहेत. यामध्ये सर्वाधिक नवविवाहीत जोडपी, तरुण-तरुणी यांचा समावेश आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी युवा पिढी पाण्यात उतरताना दिसत आहे. भरतीच्यावेळी पाण्यात अचानक भोवरा तयार होत असल्याने त्या पर्यटकांचा बिनधास्तपणा जीवावर बेतणाराही ठरत होता. किनाऱ्यावरील काही स्थानिक व्यावसायीक, जीवरक्षक त्यांना याची कल्पना देतात, परंतु त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते.
आरे वारे समुद्रकिनारी पर्यटक जीव धोक्यात टाकून खोल समुद्रात उतरत असल्याने पोलिस पाटील आदेश कदम यांनी विशेष मेहनत घेतली आहे. किनाऱ्यावरुन शिट्ट्या वाजवून धोक्याची सुचना पाटिल वारंवार देत असतात. तरीही पर्यटक पुन्हा त्याच ठिकाणी जात असल्याचे दिसत आहे. सायंकाळी किनाऱ्यावरील पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने सुट्टीच्या दिवशी पोलिसांची गस्त सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. तसे केले तर धोका पत्करुन समुद्रात उतरणाऱ्यांवर अंकुश बसेल. अन्यथा दुर्घटना झालेल्या घटनांचा आकडा आणखी वाढेल अशी भितीही व्यक्त केली जात आहे.