रत्नागिरी-दिवा दादरपर्यंत वाढवण्याची मागणी पण सुरू केली मुंबई- सावंतवाडी एक्सप्रेस
रत्नागिरी:- कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली रत्नागिरी – दिवा पॅसेंजर दादरपर्यंत वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत मध्य रेल्वेने मागील दोन वर्षांत रेल्वे मंडळाकडे पाठवलेल्या प्रस्तावांची माहिती माहिती अधिकारातून मागवण्यात आली होती. मात्र, संबंधित प्रस्तावांच्या प्रती देण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने मुंबई – सावंतवाडी – मुंबई नवी एक्स्प्रेस सुरू केल्याचा दाखला देत पॅसेंजर दादरपर्यंत वाढवण्याची मागणी पूर्ण झाल्याचे उत्तर दिले आहे. रेल्वेच्या या उत्तरावर कोकण विकास समितीने आक्षेप घेतला असून, पॅसेंजर आणि एक्स्प्रेसमधील थांबे व तिकीटदरातील फरकामुळे प्रवाशांच्या अडचणी कायम असल्याचे म्हटले आहे.
रत्नागिरी – दिवा – रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत वाढवण्यासंदर्भात मध्य रेल्वेने गेल्या दोन वर्षांत रेल्वे मंडळाला पाठवलेल्या प्रस्तावांच्या प्रमाणित प्रती माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आल्या होत्या. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी यासाठी अर्ज केला होता. तसेच रेल्वे मंडळाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर म्हणून पाठवलेले सुधारित किंवा पूरक प्रस्तावही मागण्यात आले होते.
मात्र, मागणी केलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याऐवजी मध्य रेल्वेने अवघ्या तीन ओळींच्या उत्तरात ८ सप्टेंबरपासून गाडी क्रमांक १५०८७/८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याचे नमूद केले. या नव्या गाडीमुळे रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत वाढवण्याची प्रवाशांची मागणी पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र, नव्या एक्स्प्रेसचे थांबे मर्यादित असल्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना तिचा अपेक्षित लाभ मिळत नाही. रत्नागिरी – दिवा पॅसेंजरमुळे या भागातील प्रवाशांना दिवा, दादर आणि मुंबईशी जोडणारी सोयीची सेवा उपलब्ध होत होती. अनेक स्थानिक प्रवासी या गाडीवर अवलंबून होते. त्यामुळे एक्स्प्रेस सुरू करणे आणि पॅसेंजर दादरपर्यंत वाढवणे या दोन वेगळ्या बाबी असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
वेळेचाही प्रश्न प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. रत्नागिरी आणि रायगड परिसरातील पॅसेंजरची वेळ प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासासाठी सोयीची होती. याउलट नव्या एक्स्प्रेसची या भागातील वेळ मध्यरात्री १ ते पहाटे ३ च्या दरम्यान असल्याने नोकरी, व्यवसाय आणि नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी ती फारशी उपयुक्त ठरत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. नव्या गाडीची वेळ तुतारी एक्स्प्रेसशी साधर्म्य साधणारी असल्याने स्वतंत्र पर्याय उपलब्ध झालेला नसल्याचाही दावा करण्यात येत आहे.
पॅसेंजर आणि एक्स्प्रेसच्या थांब्यांबरोबरच तिकीटदरातही फरक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना पॅसेंजरची गरज कायम आहे. त्यामुळे नव्या एक्स्प्रेसचा पर्याय पुढे करून मूळ मागणी पूर्ण झाल्याचे सांगणे योग्य नसल्याची भूमिका कोकण विकास समितीने घेतली आहे. रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत वाढवून कोकणातील छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना मुंबईशी जोडणारी पूर्वीची सोयीची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.