पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त
रत्नागिरी: शहरातील मजगाव रोडवर असलेल्या बगदादी चौकातील एका पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या या पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि साठा केल्याप्रकरणी संबंधित दुकानदाराविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकणनगर बस स्टॉपजवळ, बगदादी चौक येथील ‘अब्दुल पान शॉप’ मध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि पानमसाला छुप्या पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याआधारे २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती व्यंकटेश घरत (वय ३९ वर्षे) यांनी पथकासह या दुकानावर छापा टाकला. या तपासणीदरम्यान मानवी आरोग्याला अपायकारक ठरणारा २ हजार ९६४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची ३ पाकिटे आणि १५७ पाऊच आढळून आले, जे अधिकाऱ्यांनी तत्काळ जप्त केले.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी अब्दुल कादिर (वय ३१ वर्षे, रा. बगदादी चौक, कोकणनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बंदी असतानाही अशा प्रकारे छुप्या पद्धतीने अमली घटकांची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.