वृद्ध महिलेला मारहाण करून फळझाडांची केली तोडफोड, ६ जणांवर गुन्हा
राजापूर: तालुक्यातील चिखलगाव वरची जड्यारवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून ७० वर्षीय वृद्ध महिलेला घरात एकटी गाठून बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर संशयितांनी घराच्या अंगणातील फळझाडे तोडून मोठे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात एकाच घरातील सहा जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, शिवीगाळ व तोडफोड केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखलगाव वरची जड्यारवाडी येथील रहिवासी आनंदी बापू पळसमकर (वय ७० वर्षे) आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित आहे. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास आनंदी पळसमकर या आपल्या घरात एकट्या असताना घरामागील परसबागेत बांधलेली सेप्टिक टँक तोडल्याचा मोठा आवाज आला. त्यावेळी त्या बाहेर आल्या आणि ‘मी घरात एकटी आहे, तोडफोड करू नका’ अशी विनंती त्यांनी केली. मात्र, याचा राग आल्याने आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या वादादरम्यान आरोपी शशिकांत, रमाकांत आणि अनुसया यांनी वृद्ध महिलेला धक्काबुक्की केली, तर दोघांनी त्यांचे दोन्ही हात पिरगाळून बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला याच टाकीत ढकलून ठार मारीन’ अशी धमकी दिली. या झटापटीत वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ तुटून नुकसान झाले. याचवेळी तानाजी, मनोहर आणि रविकांत यांनी कुऱ्हाडीने अंगणातील ४ नारळ, ४ सुपारी, २ लिंबू, ४ केळी आणि १ आंब्याचे झाड तोडून सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले.
या घटनेनंतर जखमी आनंदी पळसमकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तानाजी उर्फ तातू लखू पळसमकर (वय ८२ वर्षे), मनोहर तानाजी पळसमकर (वय ५० वर्षे), रविकांत तानाजी पळसमकर (वय ४३ वर्षे), शशिकांत तानाजी पळसमकर (वय ४५ वर्षे), रमाकांत तानाजी पळसमकर (वय ३५ वर्षे) आणि अनुसया तानाजी पळसमकर (वय ७० वर्षे, सर्व रा. चिखलगाव वरची जड्यारवाडी, राजापूर) या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ७९, ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवला असून राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.