रत्नागिरी नगर परिषदे च्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे दुःखद निधन
रत्नागिरी: शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री (बंदरकर) बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मांडवीसह संपूर्ण रत्नागिरी शहरात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांना घरी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली.
राजश्री शिवलकर या कॉलेज जीवनापासूनच अत्यंत मृदूभाषी, प्रेमळ आणि सर्वांशी मिळूनमिळून वागणूक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या म्हणून परिचित होत्या.
त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मांडवी भागातून नगरसेविका म्हणून काही काळ यशस्वी जनसेवा केली होती. प्रभागाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले होते.
मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या मांडवी येथील राहत्या घरून निघणार असून, मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल मित्रपरिवार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.