भाट्ये-पावस मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची प्रत्यक्ष पाहणी
रत्नागिरी : भाटे-पावस मार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने अपघात प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘Operation TAPE For Safe’ या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भाटे-पावस रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान रस्त्याची सद्यस्थिती, अपघातप्रवण ठिकाणे तसेच संभाव्य धोकादायक बाबींची पाहणी करून अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. वाहनचालकांची सुरक्षितता आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

पाहणीदरम्यान सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अपघातांच्या घटना कमी करण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रत्नागिरी पोलीस दलाकडून ‘Operation TAPE For Safe’ अंतर्गत अशा अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.