शेतकऱ्यांना ठार मारण्याची धमकी ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी
मोकाट गुरांनी भातशेती व नाचणीचे नुकसान केल्याप्रकरणी विचारणा केली असता, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश कृष्णा झोरे (रा. वेतोशी, धनगरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठच्या सुमारास वेतोशी फाटा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लक्ष्मण शांताराम रांबाडे (वय ४८, रा. वेतोशी वरचीवाडी, रत्नागिरी) यांच्या शेतामध्ये संशयिताने मोकाट गुरे सोडून भातशेती व नाचणी खाऊन नुकसान केले. या प्रकरणी फिर्यादी व साक्षीदार यांनी विचारणा केली असताना संशयिताने शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण रांबाडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.