शेतात काम करताना पायाला कुऱ्हाड लागलेल्या वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर:
संगमेश्वर तालुक्यातील हारपुडे (खालची घुगवाडी) येथील ६५ वर्षीय वृद्धाचा शेतात काम करताना पायाला कुऱ्हाड लागल्यामुळे आणि त्यानंतर प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जुलै रोजी सायंकािल ६.१५ वाजता ग्रामीण रुग्णालय, देवरुख (ता. संगमेश्वर) येथे घडली. या प्रकरणाची नोंद त्याच दिवशी रात्री ११.३६ वाजता करण्यात आली.मृत इसमाचे नाव तुकाराम गंगाराम बाईत (वय ६५, रा. हारपुडे, खालची घुगवाडी, ता. संगमेश्वर) असे आहे.
तुकाराम बाईत हे त्यांच्या मालकीच्या हारपुडे गावठण येथील शेतात काजूच्या झाडाला खत (पुरण) घालण्यासाठी गेले होते. यादरम्यान काम करत असताना त्यांच्या पायाला चुकून कुऱ्हाड लागली, ज्यामुळे पायाला गंभीर जखम झाली.
कुटुंबीयांनी व संबंधितांनी त्यांना त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्या पायाच्या जखमेला टाके घालून मलमपट्टी केली आणि औषधोपचार करून त्यांना घरी पाठवले.
तुकाराम बाईत घरी परतल्यानंतर त्यांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि घाम येऊ लागला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने पुन्हा ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून ते मृत घोषित केले. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.