तिवरे धरण दुर्घटनेला सात वर्षे पुर्ण; ७० टक्के पुनर्बांधणी पूर्ण
कारवाईसाठी धरणग्रस्तांचा लढा सुरूच
चिपळूण : तब्बल २२ जणांचा बळी घेणाऱ्या आणि अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या तिवरे धरण दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. धरणाच्या पुनर्बांधणीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनालाही गती मिळाली आहे. मात्र, धरणफुटीच्या चौकशीसाठी नियुक्त एसआयटीच्या अहवालावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नाराजी कायम आहे.
२ जुलै २०१९ रोजी मुसळधार पावसात तिवरे धरण फुटून भेंदवाडीतील २२ घरे वाहून गेली आणि २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर पुनर्बांधणी आणि पुनर्वसनाची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष कामाला विलंब झाला.
धरणग्रस्तांसाठी सुरुवातीला ४२ घरांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २४ घरे उभारण्यात आली. आता सिडकोमार्फत आणखी ३३ घरे बांधली जात असून एकूण ५७ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्णत्वाकडे जात आहे. प्रत्येक घरासाठी सुमारे २८ लाख रुपये खर्च होत आहे.
दरम्यान, आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे ६२.७४ कोटी रुपयांच्या निधीतून धरणाची संपूर्ण पुनर्बांधणी सुरू असून सध्या ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून पुढील वर्षी धरणात पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, धरणफुटीप्रकरणी एसआयटीने जबाबदारी निश्चित केल्याचा दावा होत असला तरी सात वर्षांनंतरही दोषींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे एसआयटी अहवाल जाहीर करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी धरणग्रस्त अजित चव्हाण यांनी केली आहे.