लांजा-अंजनारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकाचा थरारक रेस्क्यू
लांजा:-
लांजा-अंजनारी घाटात गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर गोव्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, लांजा-अंजनारी घाटात रस्त्याच्या कडेला एक टेम्पो उभा होता. हा टेम्पो चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रेलरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, ट्रेलरचा चालक गाडीच्या केबिनमध्येच अडकून पडला.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक मैदाड, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत घुले, एएसआय तळेकर, श्री. दोरखंडे आणि श्री. खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
त्याचवेळी एमआयडीसी रत्नागिरी विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे आणि त्यांच्या टीमने – ज्यामध्ये चालक हर्षल आखाडे, अग्निशमन विमचक प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांचा समावेश होता – बचावकार्य हाती घेतले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले.