रत्नागिरी-पावस मार्गावर चालत्या कारने घेतला पेट
शॉर्ट सर्किटमुळे गाडी जळून खाक
रत्नागिरी :
रत्नागिरीहून नाटेच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला झरी विनायक जवल अचानक आग लागल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून, आगीच्या या दुर्घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, गाडीमधील चार मोठे आणि दोन लहान मुले अशा एकूण सहा जणांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून नाटे येथे जाणारी ‘एमएच ०८ आर ८५८८’ क्रमांकाची ही चारचाकी गाडी पावस मार्गावरून मार्गस्थ होती. दरम्यान, भाटे परिसरात अचानक गाडीच्या वायरिंगमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि पाहता पाहता गाडीने पेट घेतला. गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने आणि प्रवाशांनी तातडीने गाडी थांबवून बाहेर धाव घेतली. त्यामुळे आगीचे लोळ पसरण्यापूर्वीच सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशामक दल तब्बल एक तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. उशिरा पोहोचलेल्या अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले; परंतु तोपर्यंत कार आगीच्या भक्ष्यात सापडून पूर्णपणे जळून खाक झाली होती.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे रत्नागिरीहून पावस मार्गे जाणारी तसेच पावस व रत्नागिरीकडे येणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आग विझवल्यानंतर आणि जळालेली गाडी बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चालत्या गाडीला लागलेल्या या भीषण आगीमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते.
