धनजीनाका येथे कार्गो गाडीची शिडीला धडक
घराच्या दुरुस्तीचे काम करणारा कामगार गंभीर जखमी
रत्नागिरी : गवळीवाडा येथील धनजीनाका उतारावर भरधाव वेगातील कार्गो गाडीने घराच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराच्या शिडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५९ वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. सुरेश गोविंद पंडित (रा. पोचरी, माईंगडेवाडी, ता. संगमेश्वर) असे जखमीचे नाव असून, त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. या अपघातप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी कार्गो गाडीचालक अरबाझ अन्वर मेमन (वय २८, रा. केबल गल्ली, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गवळीवाडा येथील धनजीनाका उतारावर सुशील मांडवकर यांच्या घराच्या वासे बदलण्याचे काम सुरू होते. यावेळी सुरेश पंडित हे शिडीवर उभे राहून काम करीत होते. त्याचदरम्यान अरबाझ मेमन हा बजाज कंपनीची मॅक्सिमा कार्गो गाडी (क्र. एमएच ०८ एएक्यू ९९०४) घेऊन उतारावरून खाली येत होता.
उतारावरील रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालकाने वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालविल्याने त्याची शिडीला जोरदार धडक बसली. या धडकेत सुरेश पंडित यांना दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.१४ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार अरबाझ मेमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.