किराणा दुकानातील उधारीच्या वादातून दुकानदारावर जीवघेणा हल्ला
लोखंडी सळईने खांद्यावर मारहाण ; दगडाने डोक्यावर प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
रत्नागिरी, : किराणा सामानाच्या पैशांवरून तसेच मागील उधारीच्या पैशांच्या वादातून किराणा दुकानदारावर लोखंडी सळई आणि दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खेडशी नाका येथील श्री सरस्वती सुपर मार्केटमध्ये घडली. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खेडशी नाका येथील श्री सरस्वती सुपर मार्केटमध्ये घडली. याबाबत भीमसिंह भवर्सिंह पुरोहित (वय ४२, रा. कारवांचीवाडी, खेडशी नाका, ता. जि. रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३८, रा. खेडशी, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमसिंह पुरोहित हे श्री सरस्वती सुपर मार्केटमध्ये व्यवसाय करत असताना संशयित रमेश खेत्री दुकानात किराणा सामान खरेदी करण्यासाठी आला होता. खरेदी केलेल्या किराणा सामानाचे पैसे तसेच यापूर्वी घेतलेल्या सामानाच्या उधारीचे पैसे यावरून फिर्यादी यांनी त्याच्याकडे विचारणा केली. याचा राग आल्याने संशयिताने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुकानाजवळ पडलेली लोखंडी सळई उचलून फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. एवढ्यावरच न थांबता, जीवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाशेजारी पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात भीमसिंह पुरोहित गंभीर जखमी झाले. या प्रकरणी संशयित रमेश खेत्री याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.