जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींविरोधातील मनसेच्या दोन वर्षांच्या संघर्षाला यश; प्रशासनाकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य
रत्नागिरी :
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि गैरसोयींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चालवलेल्या आक्रमक पाठपुराव्याला अखेरीस मोठे यश आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मनसेच्या वतीने सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर मनसेचे उप जिल्हाध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले असून, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी या सर्व मागण्यांबाबत मनसेला लिखित आश्वासन दिले आहे. या सकारात्मक निर्णयामुळे सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील काही काळापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव, तज्ज्ञ डॉक्टरांची कमता आणि नातेवाईकांची होणारी परवड या गंभीर समस्यांनी उग्र रूप धारण केले होते. या सर्व त्रुटींवर बोट ठेवत मनसेने प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर या संघर्षाची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे.
या निर्णयानुसार, आता मेंदूविकार आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. तसेच काही अतिगंभीर आजारांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी नवीन डॉक्टरांची नियुक्तीही निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांना माहितीसाठी किंवा संपर्कासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात संपर्क करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, लवकरच एक निःशुल्क हेल्पलाईन यंत्रणादेखील कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे उपचारास होणारा विलंब टळणार असून रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, रुग्णांसोबत दूरवरून येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची सोय नसल्यामुळे उघड्यावर किंवा बाहेरील आवारात ताटकळत बसावे लागत होते. यापुढे ही परवड पूर्णपणे थांबणार असून नातेवाईकांच्या तात्पुरत्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वमालकीच्या दोन ॲम्ब्युलन्स यंत्रणा आता जिल्हा नियोजन समितीकडून (DPDC) नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि गरिबांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी श्री. रुपेश जाधव यांनी केले. तसेच प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे त्यांनी स्वागत केले असून, भविष्यातही जनसामान्यांच्या हितासाठी मनसेचा हा लढा असाच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सकारात्मक बदल होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.