कोंडमळा येथील मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या लंपास
वॅगनार कारमधून आलेल्या अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी):
तालुक्यातील कोंडमळा येथे एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या कॅबिनेट रूमचा दरवाजा उचकटून आतील २२ हजार ५०० रुपये किमतीच्या तीन इन्व्हर्टर बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात वॅगनार गाडीतून आलेल्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास घडली. कोंडमळा येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीने एअरटेलचा मोबाईल टॉवर उभारला आहे. अज्ञात चोरट्यांनी या टॉवरच्या ठिकाणी असलेल्या कॅबिनेट रूमचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर रूममधील मोबाईल टॉवरला इलेक्ट्रिक बॅकअप देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अमर राजा’ कंपनीच्या तीन जुन्या वापरत्या काळ्या रंगाच्या इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरून नेल्या.
या बॅटऱ्यांची प्रत्येकी किंमत ७ हजार ५०० रुपये असून एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चोरीच्या वेळी चोरट्यांनी एम.एच. ४८ डी.सी. ८६५८ (MH-48-DC-8658) या क्रमांकाच्या वॅगनार गाडीचा वापर केल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी अक्षय अरुण गाडे (वय ३१, व्यवसाय – नोकरी, रा. डेरवण फाटा, सावर्डे, ता. चिपळूण) यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आणि त्यांची रीतसर परवानगी घेऊन मंगळवारी रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी संबंधित वॅगनार गाडीतील अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा (रजिस्टर नंबर १५२/२०२६) दाखल केला असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.