रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यासह दोन जण जाळ्यात
परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली होती ८० हजारांची लाच; ६० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना खाजगी इसमाला रंगेहात अटक
रत्नागिरी : जयगड बंदरात दुरुस्तीसाठी आलेल्या एका परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी आणि समुद्र चाचणीच्या परवानगीकरिता ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वर्ग-१ मधील प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यासह एका खाजगी इसमाला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय आणि बंदर प्रशासन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७) आणि खाजगी इसम मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. घाणेकर आळी, रत्नागिरी; मूळ रा. काळबादेवी भटजीवाडी नं. १) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३७ वर्षीय तक्रारदार हे शिपिंग एजन्सी चालवतात. रत्नागिरी जिल्ह्यात जगभरातून येणाऱ्या जहाजांना सेवा पुरवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे अशी कामे त्यांच्या एजन्सीमार्फत केली जातात. जयगड पोर्ट येथे आलेल्या एका परदेशी नादुरुस्त जहाजाची दुरुस्ती तक्रारदारांच्या एजन्सीकडून पूर्ण झाल्यानंतर, संबंधित जहाजाची समुद्रामध्ये चाचणी घेण्याची परवानगी आणि पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी तडजोडीअंती ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी सहमती दर्शविल्यानंतर संबंधित जहाजाला समुद्र चाचणीऐवजी फायर फायटिंग ट्रायलची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी दि. १० नोव्हेंबर रोजी भुजबळ यांनी पुन्हा ८० हजार रुपयांची मागणी केल्याने तक्रारदारांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १६ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष मोबाईल कॉलद्वारे तक्रारीची पडताळणी केली. या संभाषणात संदीप भुजबळ यांनी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता खाजगी इसम मिलिंद बनप याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिर येथील हॉटेल कार्निवल रेस्टॉरंट अँड बारमध्ये सापळा रचला. या ठिकाणी मिलिंद बनप याने संदीप भुजबळ यांच्या वतीने तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली आणि पैसे मिळाल्याची माहिती भुजबळ यांना फोनवरून कळवली. त्यानंतर पथकाने सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी बनप याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईनंतर दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यालाही एसीबीने ताब्यात घेतले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७ आणि ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, हेमंत पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, राजेश गावकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.