रोहित पवारांची बुद्धी भ्रष्ट झालीय; अजितदादांच्या मृत्यूवर राजकारण केल्याप्रकरणी अद्वैत कुलकर्णींचा घणाघात
रत्नागिरी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या दुःखद मृत्यूवर राजकारण करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आणि चुकीचे आरोप केले आहेत. या प्रवृत्तीचा भारतीय जनता युवा मोर्चाने तीव्र शब्द निषेध केला असून, रोहित पवार यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची घणाघाती टीका भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अद्वैत कुलकर्णी यांनी रत्नागिरी येथे केली आहे.
अजितदादांच्या आकस्मिक आणि दुःखद मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, हे दुःख केवळ एका कुटुंबाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आहे. मात्र, अशा अत्यंत संवेदनशील आणि दुःखाच्या प्रसंगीही रोहित पवार यांना यामध्ये राजकारण सुचत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचा आरोप अद्वैत कुलकर्णी यांनी केला आहे.
यावेळी बोलताना अद्वैत कुलकर्णी म्हणाले की, ज्या व्हीएसआर (VSR) कंपनीचा उल्लेख रोहित पवार करत आहेत, ती कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण्यांना आणि मान्यवर नेत्यांना विमान सेवा पुरवत आली आहे. स्वतः रोहित पवार यांनीही २०२४ च्या निवडणुकीदरम्यान याच कंपनीच्या विमानातून बारामतीचा प्रवास केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि केवळ सत्तेवर टिकून राहण्यासाठी काहीही बेताल वक्तव्ये करायची आणि लोकांची दिशाभूल करायची, हाच रोहित पवारांचा एकमेव उद्योग उरला असल्याची टीका त्यांनी केली.
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मृतांच्या नावावर आणि दुःखावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आपल्या बुद्धीला चालना द्यावी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही अशी भाषा वापरणे थांबवावे, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.