कुडली ते चिपळूण मार्गावर एसटी बस अपघात
चालकाविरोधात गुन्हा दाखल
गुहागर : कुडली ते चिपळूण मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस भरधाव वेगात चालवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडावर आदळून नाल्यात गेल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी शीर आंबेकरवाडी येथे घडली. या अपघातात पाच प्रवासी आणि बसचा वाहक असे सहा जण जखमी झाले असून, एसटी बसचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पांडुरंग दोडके (वय ३७, मूळ रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव, सध्या रा. तेलीवाडी, गुहागर) हे कुडली ते चिपळूण मार्गावर एसटी बस (एमएच १४ बीटी २७६५) चालवत होते. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास बस आबलोली ते शृंगारतळी मार्गावरील शीर आंबेकरवाडी येथे आली असता चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालविल्याने बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडावर आदळली. धडकेमुळे झाड मोडून बस रस्त्याखालील मोरीच्या चरात जाऊन अपघात झाला.
या अपघातात दर्शनी देवदास पावरी (वय ४५, रा. कुडली, बंदरवाडी), प्रतिभा पुरुषोत्तम हरचकर (वय ६७), राखी राकेश हरचकर (वय ३३), अमृता आत्माराम वासावे (वय ६५), भाग्यश्री भाग्यवान हरचकर (वय ४५) आणि एसटी बसचे वाहक सुभाष भीमू राठोड (वय ४२) हे सहा जण जखमी झाले. जखमींना मार लागून दुखापत झाली असून, अपघातात बसचेही नुकसान झाले.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर शशिकांत साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक गणेश दोडके यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२५(अ) आणि १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अपघाताची नोंद १५ नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली असून, गुहागर पोलीस पुढील तपास करीत आहेत.