दापोलीतील पोस्ट गल्लीत जुन्या फ्रीजना भीषण आग
दापोली : शहरातील अत्यंत गजबजलेल्या पोस्ट गल्ली परिसरात शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जुन्या फ्रीजना अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. सुर्वे कंपाउंड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशेजारी फर्निचर व्यावसायिकांनी ठेवलेल्या जुन्या फ्रीजनी अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा भडकल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची वाढती तीव्रता पाहता लगतच्या दाट मानवी वस्तीलाही मोठा धोका निर्माण झाला होता. आगीचा भडका आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी कोणत्याही मदतीची वाट न पाहता प्रसंगावधान राखले आणि तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यात आले. स्थानिकांच्या या धाडसी तत्परतेमुळे संभाव्य मोठी जीवित व वित्तहानी टळली असून, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान, शहरात इतकी मोठी आग लागूनही दापोली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमधून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दापोली शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात भविष्यात अशी आपत्कालीन घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने आपली अग्निशमन यंत्रणा तात्काळ अधिक सक्षम करावी आणि संकटकाळी तातडीने मदत उपलब्ध होईल अशी ठोस व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होत आहे.