आंबा, काजू, फळपीक उत्पादकांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा
उद्योगमंत्री उदय सामंत, शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनांची घोषणा
रत्नागिरी:
कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या आंबा, काजू आणि इतर फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची आणि नवनवीन योजनांची माहिती दिली. हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या कोकणी शेतकऱ्याला या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार असून, जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी सर्वप्रथम फळपीक विमा योजनेतील मोठ्या सुधारणांची माहिती दिली. सन २०२६-२७ च्या आंबा हंगामासाठी आंबा पिकाचा विमा हप्ता प्रती हेक्टर १३,६०० रुपयांवरून थेट ८,५०० रुपये इतका कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रती हेक्टर ५,१०० रुपयांची थेट बचत होणार आहे. तसेच, विमा संरक्षण कालावधी आधीच्या १५ मे वरून वाढवून आता ३१ मे पर्यंत करण्यात आला आहे, ज्यामुळे उशिरा होणाऱ्या हवामान बदलांपासून पिकांना अधिक संरक्षण मिळेल. विशेष म्हणजे, यंदाच्या फळपीक विमा योजनेत पहिल्यांदाच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आला असून, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र उभारणीचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे, जेणेकरून अचूक हवामान माहिती मिळून योजना प्रभावीपणे राबवता येईल.
जिल्ह्यातील काजू उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने ‘मागेल त्याला काजू’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. ज्या शेतकऱ्यांना इतर कोणत्याही लागवड योजनांचा लाभ घेता आलेला नाही, त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ४ लाख काजू कलमे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एका पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त ५० कलमे मोफत मिळतील. या उपक्रमामुळे जिल्ह्यात सुमारे २,००० हेक्टर नव्या क्षेत्रावर काजू लागवड वाढणार असून, भविष्यात याद्वारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे चलन रत्नागिरीत निर्माण होणार आहे.
गेल्या हंगामात पडलेली कडाक्याची थंडी आणि बदललेल्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे जे प्रचंड नुकसान झाले होते, त्याची दखल घेत राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १८ कोटी रुपयांची मदत वितरित केली आहे. याशिवाय, मागील वर्षाच्या फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्याला ८८ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून त्याचे वाटप सुरू आहे, ज्याचा लाभ २८ ते ३० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे; तर उर्वरित विम्याचा हप्ताही लवकरच दिला जाणार आहे.
कृषी क्षेत्रात आधुनिकतेचा वापर वाढवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा नियोजन निधीतून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उत्पादनवाढ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात २४ क्लस्टर्स विकसित केले जातील आणि सुमारे ५०० शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, हवामान विश्लेषण व वैज्ञानिक मार्गदर्शनाच्या साहाय्याने आंबा आणि काजू पिकांची उत्पादकता वाढवण्यास मदत केली जाईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि महिला बचत गटांना रोजगार देण्यासाठी काजू बोंडू प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना दिली जाणार आहे. काजू बी काढल्यानंतर वाया जाणाऱ्या बोंडूवर प्रक्रिया करणारे उद्योग आगामी काळात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येतील, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन साधन तयार होईल. तसेच, आंबा पिकाच्या काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी आणि चांगल्या पायाभूत सुविधांसाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’मधून रत्नागिरी जिल्ह्यात २ टन क्षमतेचे मैंगो रायपनिंग चेंबर (आंबा पिकवण्याची केंद्रे) मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येणार आहेत.
भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, यंदाच्या पावसाची परिस्थिती आणि अल-निनोचे संकट लक्षात घेता ३१ जुलै या अंतिम मुदतीपूर्वी भात आणि नाचणी पिकाचा विमा उतरवून घ्यावा. भात पिकासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता ६५० रुपये तर नाचणीसाठी ४०० रुपये प्रती हेक्टर असून, नुकसान झाल्यास भातासाठी ६०,०००० रुपये आणि नाचणीसाठी ४०,००० रुपये प्रती हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. रत्नागिरीच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करणाऱ्या या सर्व योजनांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी शेवटी केले.