संगमेश्वरात वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला
मारहाणीत जखमी उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर:
घरातील जमिनीच्या किंवा कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत ८४ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वसंत रामचंद्र माने (वय ८४, रा. सुर्वेवाडी, ता. संगमेश्वर) यांचा उपचारादरम्यान मुंबईतील सायन रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी वसंत माने आणि त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा माने हे आपल्या राहत्या घरी असताना, त्यांचे चुलत दिर राजेश आत्माराम माने आणि त्यांच्या पत्नीने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत वर्षा माने यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत होऊन त्यांना चार टाके पडले. तसेच, वसंत माने यांना आत्माराम माने आणि रुतिक्षा यांनी जोरात धक्का दिल्याने ते जमिनीवर पडले, ज्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
मारहाणीनंतर वसंत माने यांना तातडीने साखरपा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना कर्नाटक येथील पॅरालिसिस स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आणि शेवटी १२ जुलै रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १३ जुलै रोजी पहाटे २ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणाची नोंद १७ जुलै रोजी सायन रुग्णालय, मुंबई येथे करण्यात आली असून, बी.एन.एस.एस.कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (अमृ. क्रमांक २४/२०२६) नोंद झाली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच ८४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे सुर्वेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आता आरोपींविरुद्धच्या पुढील कायदेशीर कारवाईसाठी तपास करत आहेत.