अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरेंचा हात?’
रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ
मुंबई: महायुतीच्या मित्रपक्षांच्या दोन बड्या नेत्यांमध्येच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. विशेष म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावरुनही रामदास कदम यांनी संशय व्यक्त करत सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले. अजित पवार यांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात आहे का? असा संशय निर्माण होत असल्याचं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.
“सुनील तटकरे अजित पवार यांच्या सर्वात जवळचे का होते? हे माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती आहे. मी काय बोलू? उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई यांनाही हळूहळू कळेल. ताई हुशार आहेत. त्यांना समजेल. शहाण्याला अधिक न बोलणं चांगलं. सुनील तटकरे कुणाचेही होणार नाहीत. ते अंतुले साहेबांचे पीए होते. अंतुले साहेबांना ह्यांनीच संपवलं. जो माणूस ह्यांना जवळ घेतो त्यांना ते संपवतात. हे मी पहिल्यांदा ऐकतोय की, त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं. तर मग अजितदादांच्या घातपातमध्ये याचाही हातपात आहे की काय? असा संशय निर्माण होतो. त्या अँगलनेदेखील तटकरेंची चौकशी झाली पाहिजे. त्यांची अवास्तव महत्त्वकांक्षा आहे, ते काहीही करु शकतात”, असा घणाघात रामदास कदम यांनी केला.
“सुनील तटकरे ही व्यक्ती म्हणजे एहसान फरामोश, ज्या थाळीत खायचं तिथेच छेद करायचं, अशी ही तटकरेची औलाद आहे. त्याच्या निवडणुकीला माझ्या पाठीला जखम असताना मी खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या चार तालुक्यांमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं. मला लोकं म्हणत होते की, भाई हा कुणाचा होणार नाही. त्याची वेळ निघून गेली की तो आपल्याला होणार नाही. नेमकं तसंच झालं. त्याची वेळ निघून गेली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी माझ्या मुलाच्या विरोधात त्याने काम केलं. वैशिष्ट असं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेची महायुती असताना त्यांनी गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांना मदत केली. अशी ही तटकरेची औलाद आहे. तटकरे तुला माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
रामदास कदम यांचा सुनील तटकरे यांना मोठा इशारा
“तू ज्या मेव्हण्याला सांगतोस, त्याची माझ्याजवळ बसायची लायकी तरी आहे का? तुझी सासरवाडी कोयनाची, अजित दादा आणि तुमच्यावर ज्या कोकणातील 16 धरणांचे 70 हजार कोटींचे आरोप होते, त्यातील हे कोयना धरण होते. गेले अनेक वर्ष जे काम बंद पडलं होतं तटकरे हे तुमचं पाप होतं. 25 वर्षांपासून माझ्या 14 गावचे लोकं पाण्यापासून वंचित राहिले. तटकरे हे तुमचं पाप होतं. मी त्यादिवशी भाषणात मुद्दाम उल्लेख केला नाही. पण शेवटी तुम्ही तुमची अवकात दाखवली म्हणून आता बोलतोय. अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिला त्यावेळेला हे सर्व आरोप मागे घेतले गेले. जनता सर्व जाणते. मला बोलायला लावू नको”, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
“कोण तुझा मेव्हना, माझं भाषण संपताना येतो आणि मंचावर येवून माझ्या खुर्चीवर बसतो. इतर महत्त्वाचे नेते खाली बसले आहेत. काही प्रोटोकॉल वगैरे नाही का? स्वत:ला तटकरे समजतो का? ठीक आहे निवडून आला. मान्य केलं. पण ही दादागिरी कुठली? याला माज म्हणतात. त्यामुळे मी त्यादिवशी मंचावर त्याचा माज उतरवला. त्याची औकात त्याला दाखवली. तटकरे तू सुद्धा जास्त मस्ती दाखवलीस तर तुझाही माज उतरवेन. औकातीत राहा. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे”, असादेखील इशारा त्यांनी दिला.
“मी वडिलांवरुन टीका केली नाही. तो खोटं बोलतोय, चुकीचं बोलतोय. मी असं म्हणालो की, आम्ही आज भूमीपूजन करतोय. जलपूजन तटकरेंच्या हस्ते करणार असं बोललो. तटकरे माहिती घे आणि बोल. लोकांमध्ये गैरसमज पसरवू नको. मला कळतं कुणाला बोलायचं आणि कुणाला बोलायचं नाही ते”, असं रामदास कदम म्हणाले.