अंजणारीतील ब्लॅक स्पॉटला उभारणार उड्डाणपूल
२१ कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबईला रवाना
लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटाचे चौपदरीकरण करताना तीव्र उतारावर योग्य मार्ग न निघाल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक बनला असून वाहनचालकांसाठी थेट ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत या तीव्र वळणावर एकामागोमाग एक तब्बल १२ गंभीर अपघात घडूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नव्हत्या. मात्र, परवा रात्री थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या धोकादायक वळणाला कायमस्वरूपी छेद देण्यासाठी ठोस पावले उचलली असून, जीवघेणे वळण आणि तीव्र उतार कमी करण्यासाठी नवीन पुलाच्या वरच्या बाजूने १०० मीटर लांबीचा स्वतंत्र उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे २१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा सुधारित प्रस्ताव तातडीने मंजुरी मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात पाठवण्यात आला आहे.
सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या या अंजणारी घाटातील अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत सात गतिरोधक उभारले आणि १०० रंबलर स्ट्रिपही बसवले; मात्र तरीदेखील भरधाव वाहनांच्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नाही. हा भाग सातत्याने ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असल्याने तीव्र उतार आणि वळण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी सुमारे १७ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला होता. परंतु, पोलिसांच्या वाहनाला झालेल्या ताज्या अपघातामुळे परिस्थितीचे गांभीर्य वाढल्याने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने सुचवलेल्या तांत्रिक पर्यायानुसार वरच्या बाजूला १०० मीटर लांबीचा पूल उभारण्याचा २१ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. या कामाला शासनाकडून तात्काळ प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता स्वतः प्रस्तावासह मुंबईला रवाना झाले असून, यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची अधिकृत माहिती बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.