कुवेशी गावातून पहिली हापूस आंबा पेटी वाशी बाजारात रवाना
नोव्हेंबरमध्ये १५ ते २० पेट्या पाठवण्याचा बागायतदाराचा मानस
राजापूर : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील आंबा पेटी पाठोपाठ आता राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील आंबा पेटी नवी मुंबईतील वाशी बाजारात विक्रीसाठी रवाना झाली आहे. यापूर्वी गावखडी येथील दत्ताराम पड्यार यांच्या बागेतील पहिली आंबा पेटी रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात दाखल झाली होती, जी या हंगामातील जिल्ह्यातील पहिली पेटी ठरली होती. त्यापाठोपाठ आता कुवेशी येथील प्रगतशील आंबा बागायतदार तानाजी तांबे यांच्या बागेतील हापूस आंब्याची पहिली पेटी १ नोव्हेंबर रोजी वाशी मार्केटसाठी पाठवण्यात आली आहे. याप्रसंगी तांबे कुटुंबीयांसह पावस येथील बागायतदार राजू पावसकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
तानाजी तांबे यांच्या कुवेशी येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागेतील अनेक झाडांना जून ते जुलै या कालावधीत चांगल्या प्रकारे मोहर आला होता. हा मोहर टिकवण्यासाठी त्यांनी झाडांवर प्लास्टिक कव्हर टाकून साधारणतः १० ते १५ कीटकनाशक फवारण्या केल्या होत्या. त्यांच्या योग्य निगा आणि नियोजनामुळे या मोहराला आंबे धरले व ते टिकून राहिले. दरवर्षी वातावरणातील बदलांमुळे आंब्याचे प्रमाण कमी-जास्त होत असतानाही अत्यंत प्रतिकूल हवामानात तानाजी तांबे यांनी घेतलेल्या अखंड परिश्रमामुळे हा आंबा आता विक्रीयोग्य तयार होण्याच्या मार्गावर आहे.
चालू नोव्हेंबर महिन्यात आपल्या बागेतून बाजारात १५ ते २० आंबा पेट्या पाठवण्याचा मानस तानाजी तांबे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. १ नोव्हेंबर रोजी वाशी मार्केटला रवाना करण्यात आलेल्या या सहा डझन आंबा पेटीला बाजारात नेमका काय दर मिळतो, याकडे आता संपूर्ण जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.