वळके गावाच्या विकासाला डिजिटल बळ
बीएसएनएल मोबाईल टॉवरचे उत्साहात लोकार्पण
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील वळके गावातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मोबाईल नेटवर्कची समस्या अखेर दूर झाली आहे. शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी वळके येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘बीएसएनएल’ मोबाईल टॉवरचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
वळके गावचे सरपंच उत्तम सावंत व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या टॉवरचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. या टॉवरसाठी सहकार्य करणारे जमीनमालक व देणगीदार कृष्णकुमार दिपाजी सावंत तसेच बीएसएनएल प्रशासनाचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हायस्पीड मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. या सुविधेमुळे वळके गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांची संपर्क यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे. यामुळे ऑनलाइन प्रशासकीय कामकाज, शासकीय योजनांचे अर्ज, डिजिटल व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी हे नेटवर्क अत्यंत उपयुक्त ठरणार असून गावात आनंदाचे वातावरण आहे.
या सोहळ्याला वळके गावचे मानकरी कृष्णकांत सावंत, संजय सावंत, मिलिंद सावंत, अविनाश सावंत, शैलेश सावंत, एल. टी. सावंत, शाखाप्रमुख शशिकांत घुमा, संजय शिवगण, मंडळ कृषी अधिकारी ढेरे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी संजय दळवी, सहाय्यक कृषी अधिकारी अजय कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी सावंत, सौ. वैशाली भुवड, सुभाष सावंत, पोलीस पाटील अपर्णा कोकरे, माजी सैनिक रवींद्र देसाई, महिला ग्रामसंघ अध्यक्षा सौ. श्वेता घुमा, आशा स्वयंसेविका सौ. उत्कर्षा सावंत, अंगणवाडी सेविका सौ. रविता सावंत, सौ. शुभदा गुरव, ग्रामरोजगार सेविका कु. स्वामिनी सावंत यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.