अंजनारी पुलाजवळ कंटेनरची पोलीस वाहनाला जोरदार धडक, दोन पोलीस अंमलदारांसह चालक गंभीर
लांजा:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाअलीकडील उतारावर शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने हातखंबा वाहतूक शाखेच्या (टॅप) शासकीय वाहनाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पोलिसांचे शासकीय वाहन थेट नदीच्या खोल उतारावर जाऊन पलटी झाले, तर कंटेनरही रस्त्यालगत उलटला. या दुर्घटनेत वाहनातील दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले असून, कंटेनरचा चालकही आत अडकल्याने गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा टॅपचे शासकीय वाहन (क्रमांक MH 08 BE 3561) अंजनारी पुलाजवळील उतारावरून जात असताना, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरने (क्रमांक RJ 09 GE 2397) पोलीस वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पोलिसांचे वाहन महामार्गावरून थेट नदीच्या दिशेने खोल उतारावर जाऊन उलटले.
या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार शिंगाडे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार संतोष गायकवाड हे दोघे जबर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिक व पोलीस यंत्रणेने दोघांनाही तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले आहे.
दुसऱ्या बाजूला, धडक दिल्यानंतर सदर कंटेनरही रस्त्याच्या शेजारी पलटी झाला. या अपघातात कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा), पोलीस निरीक्षक सानप यांच्यासह लांजा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू आहे.