चिपळूण पोलीस ठाण्यासमोर विनापरवानगी निदर्शने
महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हा
चिपळूण: पोलीस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेश व नोटीसचे उल्लंघन करून चिपळूण पोलीस ठाण्याच्या गेट क्रमांक २ जवळ मुख्य रस्त्यालगत विनापरवानगी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत शांतता भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत विजय गुरव (ब. नं. ५१५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी पावणेबारा ते पावणेएक वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिकेत साळवी (वय ३४, रा. खेर्डी, चिपळूण), मुजफ्फर ऊर्फ राजेश मुल्लाजी (वय ४२, रा. सावर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष), ॲड. प्रसाद करंदीकर (वय ४०, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती), योगेश भारत वाघमारे (वय ४६, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती), अनंत शिंदे (वय ३६, रा. अलोरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष) यांच्यासह सुमारे २५ ते ३० लोकांनी समान उद्देशाने एकत्र येत महाराष्ट्र लोकाधिकार समिती नावाचे फलक लावून आंदोलन छेडले.
पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश व रीतसर नोटीस बजावली असतानाही त्याचे थेट उल्लंघन करत आंदोलकांनी चिपळूण पोलीस ठाण्याच्या डाव्या बाजूकडील गेट क्रमांक २ च्या मुख्य रस्त्यालगत बेकायदेशीरपणे धरणे निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांविरोधात मोठमोठ्याने निषेध घोषणा देत सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, १८९, १९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०/११७ व ११२/११७ अन्वये गुन्हा नोंद क्रमांक ३४५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.