हेल्मेट न घातला निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात ; एक महिला जखमी
रत्नागिरी, : हेल्मेट न घालता आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल प्रकाश कांबळे (वय ३२, मूळ रा. आंबेडकरवाडी, रत्नागिरी; सध्या रा. जी-विंग, ५०४, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास समित्रनगर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रफुल्ल कांबळे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन हेल्मेट न घालता आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या सुवर्णा गजानन इंदुलकर (वय ६०, रा. विघ्रवली, देवळे, ता. संगमेश्वर) यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्या जखमी झाल्या. या प्रकरणी आदेश गजानन इंदुलकर (वय २९, व्यवसाय कंत्राटदार, रा. विघ्रवली, देवळे, ता. संगमेश्वर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.