ग्राहक आयोगाचा सोने व्यापाऱ्याला दणका
साडेदहा लाख रुपयांची सव्याज भरपाई देण्याचे आदेश
रत्नागिरी : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोरील एका महत्त्वाच्या निकालात, ग्राहकाकडून सोन्याचे दागिने बनवण्यासाठी पैसे घेऊनही वेळेत दागिने न देता टाळाटाळ करणाऱ्या रत्नागिरीतील एस. के. ज्वेलर्सला मोठा दणका बसला आहे. आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्रा, सदस्य स्वप्नील मेढे आणि सदस्या अमृता भोसले यांच्या पीठाने एस. के. ज्वेलर्सचे संचालक किशोर दत्तात्रय बोरसुतकर यांच्याविरुद्ध तक्रारदाराच्या बाजूने निकाल देताना, तक्रारदारास साडेसहा लाख रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आणि शारीरिक-मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, तक्रारदार प्राची सुरज शिरधनकर यांना सोन्याचे दागिने (जसे की, ३० ग्रॅमची पाटली जोड, २० ग्रॅमची बांगडी जोड आणि २२ ग्रॅमचा हार) बनवून घेण्यासाठी एकदम मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांनी एसः के. ज्वेलर्सकडे वेळोवेळी ६,००,००० ते ६,५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली होती. डिझाईन ठरल्यानंतर जानेवारी २०२५ च्या दुम्नया आठवड्यात दागिने ताब्यात देण्याचा काळ निश्चित करण्यात आला होता आणि ज्वेलर्सने २१ डिसेंबर २०२४ रोजी पावती देखील दिली होती. परंतु, ठरलेल्या मुदतीत दागिने दिले नाहीत आणि विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात आली.
दरम्यान, १२ मार्च २०२५ रोजी सामनेवाला यांनी एक समजूतीचा करारनामा लिहून दिला होता, ज्यामध्ये आठ दिवसांत दागिने देणे किंवा शक्य नसल्यास ६,५०,००० रुपये परत करण्याचे मान्य केले होते. परंतु त्यानंतरही ना दागिने मिळाले ना पैसे परत मिळाले. अखेर वैतागून नोटीस पाठवल्यानंतर ज्वेलर्सने ६,५०,००० रुपयांचा धनादेश दिला, जो बँकेत भरला असता अपुऱ्या रकमेमुळे २१ जुलै २०२५ रोजी अनादरित होऊन परत आला. या नंतर तक्रारदारांना नाईलाजास्तव ग्राहक आयोगाचे दार ठोठावावे लागले.