दुर्गम भागात अथक प्रयत्नांनंतर म्हाप्रळचा वीजपुरवठा पूर्ववत
उच्चदाब वाहिनी वरील पडलेले ११ पोल बदलले
रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ गाव व परिसरातील वाड्यांचा वीज पुरवठा सोमवार, दि. १९.१०.२६ रोजी सायंकाळी झालेल्या पाऊस व वादळ वाऱ्यामुळे खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्गम व डोंगराळ भागात युद्धपातळीवर काम करून बुधवार दि.२१.१०.२६ रोजी रात्री १०.१९ वाजता हा वीज पुरवठा पूर्ववत केला. यामुळे १३ वाडी-वस्त्यातील १३४६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला. या कामादरम्यान ११ के.व्ही. म्हाप्रळ उच्चदाब वाहिनीवरील पडलेले ११ खांब बदलण्यात आले.
सदर सर्व खांब बोलाडेवाडी ते चिंचाळी धरण या अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात असून, या मार्गावर अत्यंत धोकादायक उतार व अवघड भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे साहित्य, मनुष्यबळ व यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचवून प्रत्यक्ष काम करणे अत्यंत आव्हानात्मक होते. प्रतिकूल परिस्थितीतही मात्र हे आव्हान पेलत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस अथक परिश्रम घेत ११ के.व्ही. वाहिनीवरील चे ११ खांब बदलून वीजपुरवठा सुरळीत केला.
या कठीण व दुर्गम भागातील कामादरम्यान म्हाप्रळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत काम करणाऱ्या पथकाला आवश्यक सहकार्य करून वीजपुरवठा लवकर पूर्ववत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कमलाकर अंबाडे, शाखा अभियंता स्वप्नील मगरे (मंडनगड), अनिकेत खोंड (बाणकोट), संतोष पादीर (देवारे), सर्व जनमित्र, कंत्राटदार हनुमंत अलदार, हसीब बिजापूरे, रुपेश सपकाळ, महेंद्र जगताप, सुधाकर पवार, सुमेद वैद्य, पंकज घाग, अमय मोडक, दत्तात्रय पिंगळे यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उत्कृष्ट समन्वयातून हे आव्हानात्मक काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.