म्हाप्रळ-आंबेत पुलाचे बार्जेसच्या धडकेने नुकसान; बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा
मंडणगड:
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतानाही सुरक्षिततेचे कोणतेही उपाय न केल्याने, सावित्री नदीतील तीन बार्जेस सुटून म्हाप्रळ-आंबेत पुलावर आदळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून पुलावरील प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी बार्ज मालकाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ६ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. मौजे सापे (ता. महाड) येथील सर्वे नं. ३९/२ जवळ तीन बार्जेस (MV AL SUBHAANI, MV DULDUL VI आणि MV ZOYA) नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला पूर आला असताना बार्ज मालक रशाद अहमद मुजावर (रा. वांद्रे, मुंबई) यांनी बार्जेस सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नव्हत्या, तसेच रस्या व नांगरांची योग्य देखभाल केली नव्हती.
पुराच्या प्रवाहामुळे या बार्जेसच्या रस्या तुटल्या आणि त्या वाहू लागल्या. यातील ‘MV AL SUBHAANI’ ही बार्ज म्हाप्रळ-आंबेत पुलाखालून वाहत जाऊन खाडीकिनारी अडकली, तर इतर दोन बार्जेस (‘MV DULDUL VI’ आणि ‘MV ZOYA’) पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास म्हाप्रळ-आंबेत पुलावर जोरात धडकल्या. यामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना ६ जुलै रोजी घडली असली तरी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १७ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग महाड आणि उपविभागीय अभियंता, सा.बा. विभाग माणगाव यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रांनुसार, कनिष्ठ अभियंता ओंकार शिरगांवकर यांनी फिर्याद दिली.
या प्रकरणी बार्ज मालक रशाद अहमद मुजावर यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ३२४(५), २८९ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ च्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंडणगड पोलीस अधिक तपास करत आहेत.