रत्नागिरीच्या सुपुत्राची ‘नीट’मध्ये उत्तुंग भरारी
एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम, देशात चौथा क्रमांक
रत्नागिरी : जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर कठीण ध्येय गाठता येते, हे रत्नागिरीच्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने सिद्ध केले आहे. राजापूर तालुक्यातील पडवे येथील रहिवासी असलेल्या भावेश सुरेश चव्हाण याने ‘नीट’ परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत देशात रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. ‘री-नीट २०२६’ परीक्षेत ६६६ गुण मिळवत ९९.९६६८९८३ पर्सटाइलसह त्याने एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटकावला आहे.
भावेशचे सहावी ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेजची निवड केली. दहावीपासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित करणाऱ्या भावेशने अकरावी आणि बारावीमध्ये पूर्णपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. नवोदय विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्याचे स्वतःचे अथक प्रयत्न यांमुळेच हे यश त्याला गवसले आहे.
भावेशचे वडील एका खासगी संस्थेत कार्यरत आहेत, तर आई शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, भावेशने आपल्या ध्येयाप्रती कधीही तडजोड केली नाही. मुलाच्या या यशाने चव्हाण कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांना आपल्या पुत्राचा सार्थ अभिमान वाटत आहे.
देशातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थ्यांच्या गर्दीत, परीक्षेची काठिण्य पातळी ओलांडत भावेशने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.