सप्तलिंगीजवळ कारचा चक्काचूर! डोंबिवलीचे दोन तरुण गंभीर जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वांद्री सप्तालिंगी पुलाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडून रत्नागिरीच्या दिशेने येणारी वॅगनआर कार डोंगरावर आदळून महामार्गावर पलटी झाल्याने हा अपघात घडला. जखमी दोघेही डोंबिवलीचे रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील सुजित लोखंडे (वय २५) आणि सचिन गव्हारे (वय २४) हे दोघे वॅगनआर कारने (क्रमांक MH 01 CR 5250) मुंबईहून रत्नागिरीकडे निघाले होते. सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील वांद्री सप्तालिंगी पुलाजवळ त्यांची कार आली असता, अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेगात असलेली ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर जोरदार धडकली आणि त्यानंतर महामार्गावरच उलटली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झाला आहे.
या दुर्घटनेत कारमधील दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून ते बेशुद्धावस्थेत असल्याने अपघात घडला तेव्हा नेमके वाहन कोण चालवत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र चिपळूणचे पोलीस उपनिरीक्षक बेग, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलीस पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही गंभीर जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. तसेच अपघातामुळे महामार्गावर बाधित झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असून, संगमेश्वर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.