कुवे येथील विवाहितेचा गळफासाने मृत्यू
लांजा : गळफास लावून घेतलेल्या कुवे वारिशेवाडी (ता. लांजा) येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शुभ्रा ऋषिकेश यादव (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत असलेले ऋषिकेश प्रकाश यादव हे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी झापडे येथे विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी फोन करून कळवले की, सून शुभ्रा हिने घरातील बेडरूममधील पाईपला साडीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सासरे प्रकाश यादव यांनी हा प्रकार पाहताच कोयतीने साडी कापून मुलगा अनमोल याच्या मदतीने शुभ्रा यांना तातडीने खाली उतरवले व प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवले.
यानंतर नातेवाईकांनी शुभ्रा यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये हलवले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांना पुन्हा रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ७ ऑक्टोबर रोजी पहाटे १:३४ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय माहोलकर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मयत शुभ्रा आणि ऋषिकेश यांचा विवाह १७ फेब्रुवारी २०२२ रोजी झाला होता. विवाहिता नवविवाहित असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आरंक्षा यादव आणि लांजाचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका देसाई यांनी इनक्वेस्ट पंचनामा केला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातून ई-मेलद्वारे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार अकस्मात मृत्यू क्रमांक ५२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारळकर करत आहेत.