काळोखात बुडालेल्या मिरजोळे, मजगाव व केल्ये येथील स्ट्रीट लाईट अखेर पूर्ववत!
पालकमंत्री ना. उदयजी सामंत व आमदार किरणशेठ सामंत यांच्या तत्पर हस्तक्षेपाने ग्रामस्थांचा जीव भांड्यात; सामाजिक कार्यकर्ते फैयाज मुकादम यांच्या व्हायरल मेसेजची तातडीने दखल
रत्नागिरी :
शासकीय नियमानुसार सर्व ग्रामपंचायती, शाळा, नळपाणी पुरवठा योजना आणि स्ट्रीट लाईटचे वीज मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया राज्यभरात सुरू आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत हे वीजबिल वीज मंडळाकडे (महावितरण) वर्ग करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. मात्र, काल अचानक स्मार्ट मीटरच्या कट-ऑफ सिस्टीम व तांत्रिक कारणांमुळे मिरजोळे परिसरातील मिरजोळे, मजगाव आणि केल्ये या तीन महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा महावितरणकडून थेट खंडित करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी तीव्र काळोखात फेकला गेला होता.
सध्या सुरू असलेल्या प्रचंड उन्हाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत सर्प बाहेर येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक आधीच भीतीखाली वावरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत अचानक संपूर्ण परिसरातील स्ट्रीट लाईट बंद पडल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक प्रशासकीय प्रणालीचा हा फटका थेट सामान्य जनतेला बसत असल्याने ग्रामपंचायतींवर आणि नागरिकांवर एक प्रकारे अन्यायच होत असल्याची भावना व्यक्त केली जात होती.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते फैयाज मुकादम यांनी संध्याकाळी ७:१६ वाजता सोशल मीडियावर एक सविस्तर मेसेज तयार करून तो तात्काळ व्हायरल केला. या मेसेजमध्ये त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य मांडत संबंधित विभागाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी आग्रही विनंती केली होती.
फैयाज मुकादम यांचा हा मेसेज सोशल मीडियावर पसरताच त्याची तात्काळ आणि अत्यंत गांभीर्याने दखल रत्नागिरीचे पालकमंत्री मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब तसेच संगमेश्वर, लांजा, राजापूर चे कार्यक्षम आमदार मा. श्री. किरणशेठ सामंत यांनी घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकप्रतिनिधींनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ महावितरण आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला. स्मार्ट मीटरच्या तांत्रिक कारणांमुळे किंवा निधी हस्तांतरणाच्या प्रशासकीय प्रक्रियेमुळे सामान्य जनतेला आणि ग्रामस्थांना वेठीस धरणे योग्य नाही, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना निर्देश देत बंद पाडलेला स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे थेट आदेश दिले.
पालकमंत्री ना. उदयजी सामंत व आमदार किरणशेठ सामंत यांच्या या धडक आणि सकारात्मक आदेशांनंतर वीज मंडळाच्या यंत्रणेने त्वरित हालचाली करत मिरजोळे, मजगाव आणि केल्ये ग्रामपंचायत परिसरातील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत केला. रात्रीच्या वेळी रस्ते पुन्हा एकदा प्रकाशात उजळून निघाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
स्थानिक समस्येची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते फैयाज मुकादम आणि तीनही ग्रामपंचायतींच्या वतीने पालकमंत्री मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब व आमदार मा. श्री. किरणशेठ सामंत यांचे मनापासून आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात किंवा दुर्घटना टळल्याची भावना संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे.