अंजणारी पुलाजवळ 2 कंटेनरची धडक;
एक चालक जखमी
लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ असलेल्या तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास दोन महाकाय कंटेनरमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका कंटेनरचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत मार्ग पूर्ववत केला.
मिळालेल्या वृत्तानुसार, चालक जावेद मलिक (रा. सारंगपूर, उत्तर प्रदेश) हे ‘एचआर ८४ ४५६२’ क्रमांकाचा कंटेनर घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. अंजणारी पुलावरील उताराच्या तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा कंटेनर पुढे चाललेल्या ‘एमएच ४६ डीएल ७१११’ या कंटेनरवर जाऊन आदळला. या धडकेत चालक जावेद मलिक किरकोळ जखमी झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जखमी चालकाला तात्काळ पाली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलीस चौकीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिकेड्स लावून सुरक्षितता सुनिश्चित केली तसेच क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावरून बाजूला हटवण्याची कार्यवाही सुरू केली. लांजा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.