महिला व बाल संरक्षणाबाबत जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी : जिल्हा महिला व बाल विकास विभाग कार्यालय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल संरक्षणाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
लांजा तालुक्यात पोलीस पाटील यांच्यासोबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना महिलांसाठी असलेले विविध कायदे, शासनाच्या महिला कल्याणकारी योजना तसेच महिला हेल्पलाईन 181 याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तळागाळातील महिलांपर्यंत त्यांच्या हक्कांची, कायदेशीर संरक्षणाची तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणे हा होता. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.

तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, पाठ पन्हाळे, तालुका गुहागर तसेच न्यू इंग्लिश स्कुल वरदान पाळपेणी गुहागर येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध, बाल संरक्षण तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे हक्क, बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या सेवा आणि अडचणीच्या प्रसंगी मदत कुठे व कशी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
महिला व बालकांच्या हक्कांबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, उपलब्ध शासकीय सेवा व हेल्पलाईनची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक सहभाग वाढविणे, हा या जनजागृती उपक्रमांचा उद्देश होता.