२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या जुळ्या लेकींचा वाढदिवस ठरला खास
१२ अंगणवाड्यांतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
पाचल:
सामाजिक बांधिलकी जपत आपल्या आनंदाचे क्षण समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत साजरे करण्याची परंपरा जपणारे पाचल येथील उद्योजक बाबा सुतार यांच्या कुटुंबात आज २९ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजता आनंदाचा विशेष क्षण साजरा होणार आहे. विवाहानंतर तब्बल २५ वर्षांनी बाबा सुतार व त्यांच्या पत्नी सौ. नेहा सुतार यांना लाभलेल्या कन्यारत्न श्रीशा आणि श्रीजा या जुळ्या मुलींचा प्रथम वाढदिवस सोमवारी पाचल तळवडे येथील प्रभावती हॉल सभागृहात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून सुतार कुटुंबीयांनी आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता पाचल परिसरातील विद्यार्थ्यांसोबत वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीशा आणि श्रीजा यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत पाचल हद्दीतील जवळपास १२ अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या चिमुकल्या कन्यांचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरणार आहे. आपल्या मुलांच्या आनंदाच्या प्रसंगी परिसरातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम पालक म्हणून बाबा सुतार आणि सौ. नेहा सुतार यांच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविणारा आहे.
पाचल व परिसरात बाबा सुतार हे सामाजिक कार्यासाठी परिचित नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून विविध सामाजिक प्रश्नांमध्ये सहभाग घेतला असून गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. उद्योजक म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून ते विश्वकर्मा सॉमिल, पाचलचे मालक आहेत.
पाचल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असलेले बाबा सुतार हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पाचल विभागातील युवा नेते म्हणूनही कार्यरत आहेत. पाचल पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिंपळेश्वर मित्रमंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत.
बाबा सुतार यांच्या सामाजिक कार्याची झलक त्यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्तानेही पाहायला मिळाली होती. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या या वाढदिवसाच्या सोहळ्यात त्यांनी पाचल परिसरातील प्राथमिक शाळा तसेच अंगणवाड्यांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आपल्या आनंदाचा क्षण त्यांच्यासोबत साजरा केला होता. आता श्रीशा आणि श्रीजा यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्तही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम आयोजित करून त्यांनी हीच सामाजिक परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुतार दाम्पत्याच्या आयुष्यात आलेल्या श्रीशा आणि श्रीजा यांच्या प्रथम वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून परिसरातील चिमुकल्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न पाचल पंचक्रोशीत निश्चितच वेगळा ठरणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘आपला आनंद इतरांसोबत वाटण्यातच खरा आनंद’ हा संदेश अधोरेखित होणार आहे.