खेड तालुक्यातील बहीरवली येथून तरुण बेपत्ता
अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
खेड:
खेड तालुक्यातील बहीरवली फाटा, सुसेरी नंबर १ (बौध्दवाडी) येथून एक २२ वर्षीय तरुण मध्यरात्री घरातून निघून गेल्याची आणि अद्याप परत न आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल बाबुराव शिर्के (वय २२, रा. बहीरवली फाटा, सुसेरी नं. १, बौध्दवाडी, ता. खेड) हे १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले होते. ते बऱ्याच वेळेत परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा काहीही पत्ता लागला नाही.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गैरहेतूने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यावरून २६ सप्टेंबर २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.