जयगड येथील कंपनीत बेशुद्ध पडलेल्या कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जयगड येथील जे.एस.डल्ब्यू पोर्टमधील गोडावून मध्ये बेशूध्द पडलेल्या परप्रांतिय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास निदर्शनास आली.
पुरम अच्छावराव सारीबाबू (50,रा.पेठा थिम्मापरुम पूर्व गोदावरी आंध्रप्रदेश) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत जगदीश नटवरलाल पारेख यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी 5 वा.सुमारस जगदीश पारेख हे जे.एस.डल्ब्यू पोर्ट येथे कामाला गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या कॉन्ट्रक्टमधील कामगार पुरम सारीबाबु हा तेथील युरीयाच्या गोडावूनमध्ये बेशूध्दावस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तेथील इतर कामगारांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून पुरमला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.