कोदवली धरण सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र
राजापूर: शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या कोदवली येथील नव्या आणि जुन्या धरणक्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवत हा परिसर ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय राजापूर नगर परिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण सभा पार पडली. धरणातील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवले जाणार असून, या निर्णयाची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळवण्याचा ठराव सभागृहात संमत करण्यात आला.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना कोदवली धरण आणि आंबेवाडी जॅकवेल परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले. आगामी काळात पाण्याची पातळी कमी झाल्यास पाणीटंचाई भासू नये, म्हणून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने बंधारे बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगामी दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
शहरातील घनकचरा संकलन व वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी किंवा इतर उपलब्ध निधीतून दोन डंपर आणि ट्रॉलीसह एक ट्रॅक्टर अशी नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या पालिकेकडे उपलब्ध असलेली वाहने जुनी झाल्याने वारंवार नादुरुस्त होतात, परिणामी दैनंदिन स्वच्छतेच्या कामात अडथळे येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराची वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अनेक व्यापारी स्वतःचा कचरा जागेवरच टाकून जात असल्याने सफाई कामगारांना मध्यरात्रीपर्यंत काम करावे लागते, ही बाब पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे वेळेची मर्यादा घालून कचरा न उचलणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा व तात्काळ नोटीस बजावण्याचा आदेश नगराध्यक्षांनी प्रशासनाला दिला.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन घाटावर स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि काटेकोर नियोजन ठेवण्याच्या सूचनाही यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या. या सभेतील विविध विषयांच्या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, गटनेते ॲड. जमीर खलिफे, ॲड. राहुल तांबे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी सहभाग नोंदवला, तर कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी प्रशासनाची बाजू मांडली.