संगमेश्वर येथे धावत्या बसवर दगडफेक
मागील काच फुटल्याने खळबळ
देवरुख
देवरूख आगाराची देवरूख-करजुवे ही बस संगमेश्वर बस स्थानकातून शनिवारी सकाळी ९:१५ वाजता सुटल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने धावत्या बसवर दगड भिरकावला. संगमेश्वर बस स्थानकातून बस सुटल्यावर ब्रीजखालून वळत असताना पाठीमागून आलेल्या या दगडफेकीत बसच्या मागील बाजूची काच पूर्णपणे फुटली आहे.
बसवर कोणीतरी दगड मारल्याचा मोठा आवाज येताच चालकाने तात्काळ बस थांबवली आणि खाली उतरून बसवर दगड मारणाऱ्या व्यक्तीला पकडत संगमेश्वर बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात आणले.
या घटनेची माहिती तात्काळ संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली, पोलीस तातडीने संगमेश्वर बस स्थानकात दाखल झाले. संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे