ग्रामसभांच्या माध्यमातून ६५३ ग्रामपंचायतीमध्ये पोलिस करणार समाजप्रबोधन
सायबर क्राईम, पोक्सो आणि अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम
रत्नागिरी:
सायबर क्राईम, पोक्सो कायदे आणि अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाने उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक ग्रामसभेला साधारणपणे ६० ते ७० नागरिक उपस्थित असतात, या संधीचा फायदा घेऊन जिल्ह्यातील ६५३ ग्रामसभांमध्ये थेट पोलिस कर्मचारी उपस्थित राहून समाजप्रबोधन करणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस अधीक्षक बगाटे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी, अपघात आणि पोलिस दलाकडून करण्यात आलेल्या विविध कारवायांचा सविस्तर लेखाजोखा मांडला. जिल्ह्यात वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पीडगन वाहनांच्या मदतीने दररोज सुमारे ७०० कारवाया केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा २३० किलोमीटरचा महामार्ग अत्यंत नागमोडी वळणांचा असल्याने येथे अपघातांचा धोका अधिक असतो. हेr अपघात रोखण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक, कॅट आय आणि साईड पट्ट्या लावण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी पोक्सो अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, तपासात बहुतांश गुन्ह्यांमध्ये नातेवाईक किंवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांचे आणि नागरिकांचे प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
तसेच अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिस दलाने उघडलेल्या ‘ऑपरेशन फिनिक्स’ मोहिमेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, ८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या १५ दिवसांच्या कालावधीत एनडीपीएस कायद्यांतर्गत तब्बल २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अमली पदार्थांच्या विक्रीचे १० तर सेवनाचे १३ गुन्हे समाविष्ट आहेत. या कारवाईत पोलिसांनी २२.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि २ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त करून रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. नुकतीच एका वृद्ध महिलेची ८८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्य म्हणजे अशिक्षितच नव्हे, तर सुशिक्षित नागरिकही अशा भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकत आहेत. मोबाईलवर आलेला ओटीपी अनावधानाने किंवा आमिषाला बळी पडत चोरट्यांना दिला जात असल्याने ही आर्थिक फसवणूक होत आहे.
या सर्व गंभीर बाबींचा गांभीर्याने विचार करून रत्नागिरी पोलिस दलाने गावागावात जाऊन प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे.रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक रचना दुर्गम असल्यामुळे थेट नागरिकांपर्यंत पोहोचून संवाद साधणे हे मोठे आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे जिल्ह्यातील ६५३ ग्रामसभांमध्ये पोलिस कर्मचारी स्वतः उपस्थित राहून सायबर सायबर गुन्हे, पोक्सो कायदा आणि अमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयांवर नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत, असे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले.