‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट
एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या ‘प्रोजनेसिस फर्टिलिटी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ येथे बुधवारी अचानक झालेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली. रुग्णालयातील लिफ्टच्या बॅटरी सेटअपमध्ये अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणावर धूर निघण्यास सुरुवात झाली.
बंदिस्त इमारतीमध्ये काही वेळातच धुराचे प्रचंड लोट पसरल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या वेळेवरच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून लाखोंचे संभाव्य नुकसान रोखण्यात यश आले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रुग्णालयात कामकाज सुरू असताना लिफ्टसाठी बसवण्यात आलेल्या बॅटरी बॅकअप सिस्टीममध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. पाहाता पाहाता बॅटरीमधून धूर बाहेर पडू लागला आणि तो संपूर्ण इमारतीत पसरला. धुरामुळे कर्मचाऱ्यांसह दाखल असलेल्या रुग्णांची धांदल उडाली. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वर्दी मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान सर्व यंत्रणेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य त्वरित ओळखले आणि वेळ न दवडता कारवाईला सुरुवात केली.
त्यानंतर जवानांनी विशेष यंत्रणेचा वापर करून बंदिस्त जागेत साचलेल्या धुरावर वेळीच पूर्ण नियंत्रण मिळवले.