जिल्ह्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती
जुन्या पदवीधर शिक्षकांसमोर अस्तित्वाची नवी समस्या
रत्नागिरी:
पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. २४ जुलै २०१४ च्या मूळ शासन निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची पदवी आणि बीएडधारक शिक्षक प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर म्हणून पात्र ठरले होते. त्यावेळी विषय बदलाची किंवा विस्थापनाची कोणतीही पूर्वसूचना नसल्याने शिक्षकांनी निर्धास्तपणे पदस्थापना स्वीकारली होती. मात्र, आता बदलत्या नियमांमुळे हेच जुने शिक्षक प्रशासनाच्या धोरणांमुळे त्रस्त झाले आहेत.
येत्या मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात मागणी करण्यात आलेल्या एकूण ४७० शिक्षकांपैकी पहिल्या टप्प्यात २४० विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक रुजू होत आहेत. या समुपदेशनाकरिता अपेक्षित असलेल्या जागा या आधीपासूनच भाषा किंवा समाजशास्त्र विषयांचे पदवीधर शिक्षक कार्यरत असलेल्या जागांवर आहेत. प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट धोरण जाहीर न झाल्यामुळे मूळ कार्यरत पदवीधर शिक्षकांमध्ये मोठी धाकधूक वाढली आहे.
यापूर्वी, २० फेब्रुवारी रोजी संभाव्य विस्थापित शिक्षकांचे मानसिक संकट लक्षात घेता पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत मार्ग काढण्यात आला होता. आताही ६ वी ते 7 वीच्या वर्गांकरिता पूर्वीप्रमाणेच दोन पदवीधरांची नेमणूक कायम ठेवून यावर तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार पालकमंत्री उदय सामंत आजच शिक्षक संघटनांची बैठक घेऊन या विषयावर चर्चा करणार असून, यातून काय तोडगा निघतो याकडे जिल्ह्यातील ६०० हून अधिक समस्याग्रस्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे.