उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा
राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा
पाचल:
जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील पाचल येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यालयात बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीचा शुभारंभ तसेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनातून बांबूच्या विविध उपयोगांची माहिती नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देण्यात आली. बांबू शेतीला बाजारपेठेशी जोडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा राजश्री विश्वासराव, तुषार विश्वासराव, अनंत कोलते, विलास नारकर यांच्यासह बांबू लागवड करणारे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कोकणातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत बांबू शेतीकडेही दीर्घकालीन उत्पन्नाचा पर्याय म्हणून पाहावे, यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक बांबू दिनानिमित्त कोकणातील शेतकऱ्यांसाठी बांबू शेतीतून आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जलद वाढ, विविधांगी उपयोग, तुलनेने कमी देखभाल आणि वाढती बाजारपेठ यामुळे बांबू शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून, राजापूर व लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना या शेतीची आधुनिक पद्धत आणि बाजारपेठेची माहिती देण्यासाठी समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कोकणातील लाल मातीमध्ये अभिनव कृषी उपक्रम राबवत प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या राजश्री विश्वासराव यांनी बांबू शेतीला रोजगार व उत्पन्नाचे प्रभावी साधन म्हणून पुढे आणण्याचा संकल्प केला आहे. त्याच अनुषंगाने राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे बांबू शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांबू लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रक्रिया उद्योग आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.
बांबूचा केवळ शेतीतील एक पीक म्हणून विचार न करता त्यापासून विविध उपयोगी वस्तू तयार करून मूल्यवर्धन करण्याची संधीही शेतकऱ्यांसमोर आहे. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळी उभी करण्याच्या दिशेने समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काम करीत आहे.