संगमेश्वर येथे अर्टिगा कारची रिक्षाला धडक
रिक्षाचालक जखमी
संगमेश्वर, (प्रतिनिधी) :
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूलसमोरील पुलावर एका भरधाव अर्टिगा कारने पुढे चाललेल्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल प्रकाश शिरसेकर (वय ४१, व्यवसाय- रिक्षाचालक, रा. कोकणनगर, एम.डी. नाईक गार्डनजवळ, रत्नागिरी) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राम प्रकाश लाल (वय ४०, व्यवसाय- चालक, रा. बोरिवली वेस्ट, लिंक रोड, गणपत पाटीलनगर गल्ली, मुंबई; मूळ रा. प्रयाग, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल शिरसेकर हे १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांच्या सुमारास आपल्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक एमएच ०८ बीसी ०७०७) ने प्रवाशांना घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून सावर्डेकडून रत्नागिरीच्या दिशेने येत होते.
ते संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूलसमोर असलेल्या पुलावर आले असता, पाठीमागून आलेल्या आरोपी राम प्रकाश लाल याने आपल्या ताब्यातील अर्टिगा कार (क्रमांक एमएच ४७ एवाय १६३४) रस्त्याची विशिष्ट परिस्थिती व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली. त्याने भरधाव वेगात येऊन रिक्षाच्या मागील उजव्या बाजूस जोरदार ठोकर दिली.
या भीषण धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून रिक्षाचालक कपिल शिरसेकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून ११ मिनिटांनी गु.र.नं. १३०/२०२६ अन्वये कलमे २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.